ABOUT MARATHI DEPARTMENT
श्री शिव-शाहू महाविद्यालय येथे मराठी विभागाची स्थापना शैक्षणिक वर्ष १९८३-८४ साली झाली. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य स.ग. यादव हे या विभागाचे प्रमुख होते. मराठी साहित्यामध्ये समीक्षक व कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक मराठी साहित्यिकांना परिचित आहे. यानंतर त्यांचे सहकारी म्हणून डॉ. एस. पी. सोनाळकर यांनी व डॉ.एम. आर. पाटील धुरा सांभाळली.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून मराठी विभागाचे कार्य लौकिकास साजेसे असे राहिले आहे. शाहुवाडी तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या गंगेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य मराठी विभागाने लीलया पेललेले दिसून येते. याच महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची पदवी घेऊन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात आपला लौकिक वाढवलेला दिसतो. शैक्षणिक वर्ष 1992 साली याच महाविद्यालयातील महेश बावधनकर या विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकाविले होते. त्यानंतर 2004 साली किशोर पाटील हा विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. यानंतर अलीकडेच दिपाली काळे या विद्यार्थिनीने 2020 साली शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला होता. याबरोबरच महाविद्यालयातील मराठी विभागातील विद्यार्थी अनेक स्पर्धांमधून वकृत्व स्पर्धा असो किंवा निबंध स्पर्धा असो या सर्वांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून पारितोषिके मिळवली आहेत. तसेच महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सांस्कृतिक विभागामध्ये मराठी विभागातील विद्यार्थी नेहमीच आपला सहभाग नोंदवितात. या विभागाअंतर्गत दरवर्षी अनेक उपक्रम हाती घेतले जातात. विविध मान्यवर व विचारवंतांची व्याख्याने आयोजित केली जातात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते व याच दिवशी ग्रंथदिंडी उत्साहात सरूड गावात काढली जाते.
मराठी विभागातील मान्यवर प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी प्रा. पी. बी. नाईक व डॉ. आर. ए. मुडळे यांनी प्राध्यापक म्हणून सेवा सुरू ठेवली आहे. तसेच प्रा. एस. एन. खरात व डॉ. एल. के. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मराठी विभाग उत्कृष्ट पद्धतीने कार्य करताना दिसून येतो. याच विभागाअंतर्गत दरवर्षी विविध व्याख्याने कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मुलाखत प्रक्रिया व व्यक्तिमत्व विकास असे प्रमाणपत्र कोर्सेस या विभागामार्फत चालू आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विभागामार्फत संदर्भ ग्रंथ दिले जातात व मार्गदर्शन केले जाते.